टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी ३ संशयितांना अटक; २ हरयाणाचे तर एकाचा महाराष्ट्राशी कनेक्शन

Foto
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफगोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील ३ आरोपींना राजस्थानच्या कोटा येथून अटक करण्यात आली आहे. त्यातील २ हरियाणाचे तर एक महाराष्ट्रातील आरोपी आहे. जुहू पोलिसांनी ३ अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. रविवारी संध्याकाळी टायगर श्रॉफवरगोळीबार झाला. या घटनेचा तपास मुंबई क्राइम ब्रांचकडे सोपवला होता.

मुंबई पोलिसांनी गोळीबारात जखमी झालेल्या अभिनेत्याच्या कार चालकाचा जबाब नोंदवला. या घटनेत कथितपणे ३ जणांनी गोळीबार केला होता. ज्यात ड्रायव्हरसह २ जखमी झाले. सध्या कारचालक फिरदौसवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता राजस्थानच्या कोटा येथून ३ संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कोटा पोलीस यावर निवेदन जारी करतील असं बोलले जाते. आरोपी मुंबईहून दिल्लीला जाणार्‍या ट्रेनमधून प्रवास करत असताना त्यांना कोटा रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले.

टायगरचा ड्रायव्हर फिरदौसचा जबाब नोंदवला
मुंबई पोलिसांनी जुहू गोळीबार प्रकरणी टायगर श्रॉफचा जखमी ड्रायव्हर फिरदौसचा जबाब नोंदवला आहे. या गोळीबारात टायगर श्रॉफला कोणतीही इजा झालेली नाही. सोमवारी सकाळी टायगर श्रॉफच्या घराबाहेर शांतता होती. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी परिसरात आणि घराजवळ सुरक्षा वाढवली आहे. वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानीही निगराणी ठेवण्यात आली आहे. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने पुन्हा एकदा सलमान खानचे नाव घेतले आहे.

पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाच्या कलमांखाली गुन्हा केला दाखल
दरम्यान, मुंबई पोलिसांनी बीएनएसच्या कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, जे हत्येच्या प्रयत्नाशी संबंधित आहे. हे अशा प्रकरणांमध्ये लागू होते, जिथे एखादी व्यक्ती कोणाचा तरी मृत्यू होईल या हेतूने किंवा माहितीने काहीतरी करते. याला हत्या मानली जाते. कलम ३(५) हे अनेक लोकांनी समान हेतूने केलेल्या कृत्यांशी संबंधित आहे. या तरतुदीनुसार जर हे सिद्ध झाले की प्रत्येकाचा हेतू एकच होता, तर त्या कृत्यामध्ये सामील असलेल्या प्रत्येकाला जबाबदार धरले जाऊ शकते.

तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग
टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणाचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात  आला आहे. टायगर श्रॉफचे घर आणि तो खेळायला जातो ते फुटबॉल मैदान अशा ठिकाणाची आधीच  रेकी करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. रेकी करण्यासाठी वेगळी टीम असल्याचाही मुंबई पोलिसांना संशय आहे. रेकी करणार्‍या आरोपीनी टायगर श्रॉफ कुठल्या गाडीतून फिरतो याची माहिती शूटर्सना दिल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या रेकी करणार्‍या टीमने टायगर श्रॉफ नेहमी जात असलेल्या ठिकाणांची रेकी केली होती.

टायगर श्रॉफ हल्ल्यावरील दोषींवर कारवाई होईल : मुख्यमंत्री
ही घटना अत्यंत गंभीर असून पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. आरोपींची ओळख पटवण्यात आली असून त्यांच्याबाबत प्रमुख धागेदोरे पोलिसांना सापडले आहेत. कुठल्याही परिस्थितीत या आरोपींचा शोध घेतला जाईल. या घटनेमागे कोण आहे याचाही शोध घेतला जाईल. अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाही. निश्चितपणे मुंबई पोलीस आरोपीला पकडतील असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ले करणारे भित्रे आहेत अशी संतप्त भावना व्यक्त केली.

कुठल्याही गँगला घाबरण्याचे कारण नाही. हे डरपोक लोकांचे काम आहे. हे घाबरट लोक आहेत. कुठेतरी लपून बसायचे आणि कम्युनिकेशनच्या माध्यमाचा वापर करून धमक्या देत असतील तर प्रत्येक धमकी आम्ही गांभीर्याने घेतो. त्याच्यावर कारवाई करतो. मुंबई पोलीस ही प्रोफेशनल पोलीस आहे. अशा गुन्हेगारांना मुंबई पोलीस जेरबंद केल्याशिवाय सोडत नाही. त्यामुळे टायगर श्रॉफ हल्ल्यावरील दोषींवर कारवाई होईल. कुणीही घाबरण्याचे कारण नाही असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलाकारांना केले आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलीय, राऊतांचा सरकारवर निशाणा
मुंबईत अतिशय धक्कादायक घटना पाहिल्या आहेत. सलमान खानवर झालेला हल्ला, बाबा सिद्धीकी हत्या, ठाण्यात प्रदीप पूर्णकरांची हत्या आणि कालच टायगर श्रॉफवर गोळ्या झाडण्यात आल्या. हे जंगलराज सुरू आहे. जेव्हा अशी अराजकता माजते तेव्हा सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे - संजय राऊत, खासदार